2020 नंतर 2021 च्या श्रीगणेशोत्सवाला कोरोना च्या अभूतपूर्व संकटाची किनार लाभली आहे. महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव 2021 मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मर्यादित स्वरूपाचे मंडप, गणेशमूर्तीची मर्यादित उंची, मूर्तींचे स्वरूप (पर्यावरणपूरक असावी, शक्यतो पीओपी ची नसावी), आगमन- विसर्जनाचे नियम (विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा नजीकच्या कृत्रिम तलावात करावे) ऑनलाइन गणेश- दर्शन, गर्दी नको, फिजिकल डिस्टन्सींग वगैरे..
गेल्या वर्षभरातील अनुभवातून आपण सारेच कोरोनापासून स्वतःला सुरक्षित राखणे- संदर्भात खूप काही शिकलो आहोत. नैराश्यातून मार्ग काढण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव आपल्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. खरंतर, गणेशोत्सव हा समूहाचा उत्सव आहे. समूहात राहताना सोशल डिस्टंसिंग पाळून आपण हा उत्सव साजरा करणार आहोत.
1893 पासून गणेशोत्सवाने अनेक स्थित्यंतरातून मार्ग काढीत, गणेशभक्तांना सुखरूप ठेवण्यासाठी सुखकर्ता दुखहर्ता ही आपली अविभाज्य विशेषणे खरी केली आहेत. लोकमान्य टिळकांनी विशिष्ट उद्देशाने सुरू केलेला हा गणेशोत्सव आज अशा टप्प्यावर साजरा होतो आहे, जिथे कोरोनात उध्वस्त झालेल्या कुटुंबांना आधार हवा आहे, नोकरी-व्यवसायापासून दूर फेकल्या गेलेल्यांना पुन्हा उभारी घ्यायची आहे, शाळा-कॉलेजच्या असंख्य विद्यार्थ्यांना हरवलेले दिवस पुन्हा आणून द्यायचे आहेत, ज्येष्ठांना मोकळा श्वास प्राप्त करून द्यायचा आहे… यंदाच्या श्रींच्या आरतीत भक्तांचं साकडं आहे, सजावटीत प्रबोधन आहे, विसर्जनात संकटांना निरोप देणं आहे..
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मनाचा निर्धार हवा आहे. कारण आजच्या अनेक संकटांचं मूळ पर्यावरणाच्या ऱ्हासात आहे. खरंतर श्रींच्या मूर्तीसाठी पीओपी ला पर्याय म्हणून eco friendly गणपती ही काळाची गरज आहे. गणेशाप्रती आपल्या भावना, संवेदना आपण आपल्या भक्तीतून प्रकट करतो, हे मान्य केल्यास निर्मळ भक्तीसाठी पर्यावरणपूरक श्रींची मूर्ती निवडण्यासाठी प्रत्यक्ष बाप्पाचाही कौल असेल.
मूर्तीची उंची, भव्य -दिव्यता यापेक्षाही तल्लीन- आराधनेतून श्रींशी तादात्म्य पावणं, हे महत्त्वाचं आहे.
आगमनापासून विसर्जनापर्यंत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला बाप्पाचा सहवास कायम लाभावा, यासाठी “इको मोरया गणपती” आपल्याला खुणावत आहे. श्री मूर्तीची घरपोच सेवा, मूर्ती अतिशय सुंदर, मूर्तीची ने-आण सुलभ, घरच्या घरी विसर्जन आणि पर्यावरणाला हातभार लावण्याचं खूप मोठं समाधान..
॥ इको मोरया गणपती – पर्यावरणपूरक भक्ती ॥